Saturday, January 4, 2014

स्टीव्ह वॉ

बहुतेक सर्वांना हे नाव पहिले वाचून आश्चर्य वाटेल. पण जेव्हा पासून मी क्रिकेट पाहायला लागलो तेव्हा बर्याचदा टीव्ही वर सामना चालू असला की योगायोगाने मला स्टीव्ह फलंदाजी करताना दिसायचा. इवलेसे उंदरासारखे डोळे, स्तब्ध आणि निर्विकार भाव आणि थोडा चित्र विचित्र फलंदाजीचा स्टान्स. जवळपास मी १०  वर्ष स्टीव्हला पाहत आलो आहे. जवळपास १९९५ ते २००४ अगदी त्याच्या अखेरच्या भारताविरुद्ध खेळलेल्या सिडनी टेस्ट पर्यंत. माझ्या मते परमेश्वराने स्टीव्हला कर्णधार होण्याकरताच जन्माला घातले असावे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कर्तुत्ववान कर्णधारांच्या यादीत स्टीव्ह नक्कीच अग्रस्थानी आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्यापासून उज्ज्वल कर्तुत्ववान अशा कर्णधारांची परंपरा लाभली आहे. अगदी बॉब सिम्पसन, रिची बेनो, इयन चॅपेल, बोर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह ते अगदी रिकी पोंटिंग अशी यादी आहे. Statistically रिकी पोंटिंग हा सर्वात वरचढ आहे पण त्याला मिळालेल्या यशामागे स्टीव्हच्या कष्टाचा सिंहाचा वाटा आहे. १९९७-९८ च्या भारत दौऱ्यातील अपयशाचे खापर तत्कालीन नायक मार्क टेलरवर फोडले गेले आणि संघनायक पदाची माळ स्टीव्हच्या गळ्यात पडली. त्याने या माळेचे सोने करून दाखवले. स्टीव्हच्या कर्णधारपदाच्या काळात जाग्ग्जेत्या ऑस्ट्रेलियनसंघाचा मजबूत पाया रोवला गेला आणि त्यांचा क्रिकेट विश्वात दरारा निर्माण झाला तो मात्र यशस्वीपणे रिकीने डौलाने पुढे नेला. 

पहिला खेळी त्याची पहिली असेल तर १९९५ साली वेस्ट इंडीस विरुद्ध जमैका टेस्ट मध्ये जुळा भाऊ मार्क बरीबर केलेली २३१ धावांची ऐतिहासिक भागीदारी. त्या टेस्ट मध्ये त्याने  ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाजीचा कोसळता डोलारा सावरला होता आणि दिग्गज गोलंदाज वॉल्श आणि एम्ब्रोस च्या तुफान मार्याला सामोरे जात त्याने १२६ धावा  झळकावल्या. आणि ह्याच नव्हे तर अशा कित्येक प्रसंगी स्टीव्हने आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन संघाला क्रिटीकल स्टेज मधून पार नेट विजयपथाला नेले. कठीण समय येता कोण कामास येतो? ह्या प्रश्नाचे स्टीव्ह संघात असताना  ऑस्ट्रेलियन संघाकडे एक उत्तर ते म्हणजे दस्तूरखुद्द स्टीव्ह आणि स्टीव्हच. त्याच्या फलंदाजीचे वैशिट्य म्हणजे चिवटपणा, चिकाटी, प्रचंड संयम, जिगरी आणि लढवय्या वृत्ती, विजयासाठी प्रतिस्पर्धी संघावर कोणतीही दयामाया न दाखवणे. स्टीव्ह जनरली ४-५ व्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. तो 'मिडल ऑर्डर बॅटसमन' म्हणून माझ्या मते त्याच कर्तुत्व हे जास्त उजव आहे कारण की सलामीला येणाऱ्या फलंदाजाला सेट व्हायला, परिस्थितीचे आकलन व्हायला, पीचचा अंदाज यायला बराच वेळ मिळतो जो ४-५ क्रमांकावर आलेल्या माणसाला मिळत नाही. बर्याचदा वरची फळी कापली गेल्यावर सगळा भार या 'मिडल ऑर्डर बॅटसमन' वर येतो आणि प्रसंगी त्याला टेलेंडरसना हाताला घेऊन संघाला एका आव्हानात्मक स्कोर उभारून द्यावा लागतो. स्टीव्हनी बंधू मार्क तसेच खाली यष्टीरक्षक इयन हिली, शेन वॉर्न, रायफल सारख्या गोलंदाजाना हाताशी घेऊन फटकेबाजी केलेली मी अनेकदा पहिले. त्याची विजयाची भूक प्रचंड होती आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्याची वृत्ती होती. बरेच समीक्षक त्याच्या व्यक्तिमत्वाला 'खडूस' हे विशेषण लावतात. मला त्याची हीच वृत्ती फार भावते आणि कदाचित तो याच वृत्तीमुळे जग्ग्जेत्या संघाचा नायक बनला. 

दुर्दैवाने मला त्याच्या १९८७ चा विश्वकप पाहता आला नाही कारण आमचा जन्म त्या नंतरचा. १९८७ च्या वर्ल्ड कप विजयात स्टीव्हचा सिंहाचा वाटा होता असे आकडे सांगतात. तत्कालीन कर्णधार बोर्डरने सुद्धा हे मान्य केले होते. १९९९ चा विश्वकप देही याची डोळा पाहता आला हे आमचे भाग्यच. क्वार्टर फायनलच्या आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात गिब्सने जेव्हा स्टीव्हचा झेल सोडला तेव्हाच स्टीव्हने त्याला बोलला 'You not only dropped the catch but also the World Cup'. आणि त्याने त्याचे शब्द खरे करून दाखवले. आफ्रिकेच्या नाकावर टिच्चून त्यांनी विश्वकप हिसकावून घेतला. आणि तेव्हापासून ऑस्ट्रेलियन संघाच्या यशाची गाथाच चालू झाली.१९९९ नंतर २००३ आणि २००७ असे विश्वकप ऑस्ट्रेलियन संघाने मिळवले. त्यातला १९९९ हा स्टीव्हचा शेवटचा विश्वकप. सलग १६ कसोटी विजय हे स्टीव्हच्या नेतृत्वाखाली  ऑस्ट्रेलियन संघाने मिळवले. हा एक उच्चांक मानला जातो. एखाद्या कर्णधाराच कौशल्य हे साधारणपणे त्याच्या गोलंदाज हाताळणे आणि बदल करणे किंवा फिल्डिंग लावणे यावरून तपासले जाते. स्टीव्ह हा यात निपुण होताच पण फलंदाजीचा क्रम तो गरजेनुसार वारंवार बदलायचा. उदयोन्मुख फलंदाज गिलख्रिसट च्या धडाकेबाज फलंदाजीचा उपयोग त्याने त्याला सलामीला धाडून करून घेतला. स्टीव्हच्या ह्या निर्णयामुळे गिलख्रिस्ट हा जगातील सर्वोत्तम वनडे ओपनर्स पैकी एक गणला जातो. तसेच त्याने कसोटीत मात्र त्याला ७ व्या क्रमांकाचे स्थान दिले. गरजेच्या वेळी त्याच्या तुफानी फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन संघाला अनेकदा तारले. २००१-०२ मध्ये खराब वैयक्तिक कामगिरीमुळे स्टीव्हला वनडे क्रिकेट मधून वगळले गेले. आणि वनडेचे कर्णधारपद रिकी पोंटिंगला देण्यात आले. त्याने खेळाडूना एकसंध बांधून ठेवले, एकी कायम जपली, वैयक्तिक रेकॉर्ड्सपेक्षा संघहित कायम महत्वाचे ही भावना त्याने खेळाडूंमध्ये रुजवली आणि स्वतः तसे आचरणातून कित्येकदा दाखवूनही दिले. खेळाडूंमध्ये सुद्धा त्याला मान होता, त्याच्या विरुद्ध कोणा खेळाडूने आवाज काढला नाही वा निर्णयांना विरोध केला. 

स्टीव्हचा संघ हा क्रिकेट मधील सर्वोत्तम संघ म्हणजे ब्रेडमन काळातील ऑस्ट्रेलियन संघ, क्लाईव लोयडचा वेस्ट इंडीस संघ यांच्या पंक्तीतील मानला जातो. स्टीव्हच्या कर्णधार म्हणून यशात त्याच्या सहकार्यांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे.  जसे शूरवीर,इमानी मर्द मावळे नसते तर शिवरायांना स्वराज्य मिळवणे शक्य नसते तसेच स्टीव्हचे आहे. सलामीची धुरा गिलख्रिस्ट, मार्क वॉ नंतर हेडन, मिडल ओर्डेरला पोंटिंग, मार्टिन,बेव्हन, स्वतः स्टीव्ह, मेकग्रा,गिलेस्पी, ब्रेट ली सारखे तेज गोलंदाज आणि क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम लेग स्पिनर शेन वॉर्न आणि कधी साथीला मेकगिल सारख्या शिलेदारांना हाताशी घेऊन स्टीव्हने एकछत्री अंमल स्थापन केला. त्याच्या ह्याच गुणांमुळे २००८ साली ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक संघाचा तो मानसशास्त्रीय सल्लागार बनला. २००४ साली स्टीव्हचा सिडनी ग्राउंड वरचा निरोप समारंभ अतिशय भव्य स्वरूपाचा झाला. त्या दिवशी सिडनी मैदानावर विक्रमी गर्दी लोटली होती. त्या अखेरच्या डावात त्याने नवोदित सायमन कटीचला साथीला घेत ८० धावांची जिगरबाज खेळी साकारून ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या छायेतून सुखरूप बाहेर काढून सामना अनिर्णीत राखण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याचा बळी घेतला तो अनिल कुंबळेने आणि स्टीव्हचा झेल दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरच्या हाती विसावला. तेंडूलकरने स्वतःहून स्टीव्हच्या दिशेने धावत येत त्याला हस्तांदोलन करून मानवंदना दिली. 

त्याच्या कर्तुत्वाची दाखल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेत त्याला Australian Cricket Hall of fame मध्ये पहिल्या ३० अव्वल खेळाडूत त्याला स्थान दिले. २००४ साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सर्वोच्च नागरी ऑस्ट्रेलियन पुरस्कार देऊन गौरव केला गेला. भारताचा लीजंडरी फलंदाज राहुल द्रविडने 'द हिंदू' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्टीव्ह हा माझा रोल मॉडेल आहे असे सांगितले. क्रिकेटच्या इतिहासात स्टीव्ह करता  एक यशस्वी कर्णधार आणि असामान्य खेळाडू म्हणून मानाचे पान आहे  अशा प्रकारे सर स्टीव्हन रॉजर वॉ यांना माझा मानाचा मुजरा